IMD Mansoon Update : महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला आहे, आणि पुढील काही तासांत राज्यात खूप जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार सुरुवात केली आहे. सोमवारपर्यंत मान्सूनने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापले आहेत. राज्यातील उर्वरित भागातही लवकरच मान्सून पोहोचणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तासांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईबाबत बोलायचे झाल्यास, आज मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाने सांगितले आहे की या काळात महाराष्ट्रात पाऊस येणार आहे आणि जोरदार वारेही वाहणार आहेत. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत असू शकतो. हवामान विभागाने सांगितले आहे की पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. लवकरच मान्सून संपूर्ण राज्यात पसरू शकतो.