सोने-चांदीच्या दरात धडाकेबाज घसरण! 24 तासांत सोनं 6000 ने आणि चांदी 7000 ने स्वस्त
Maharashtra Gold Silver Price: दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या शुभ सणानिमित्त महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, विशेषतः जळगावातील सोने बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सोनं खरेदी करणे हे शुभ मानले जात असल्याने नागरिकांनी मोठ्या उत्साहात सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली. मात्र, या खरेदीच्या उत्साहातच सोन्या-चांदीच्या बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केवळ 24 तासांच्या कालावधीत सोन्याच्या दरात तब्बल ₹6000 आणि चांदीच्या दरात ₹7000 इतकी घसरण नोंदवली गेली आहे.
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण
दिवाळीनंतरच्या काळात, पाडवा निमित्त ग्राहकांची सोने खरेदीसाठी झपाट्याने गर्दी वाढू लागली. याचदरम्यान सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. जीएसटी वगळता सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम ₹1,23,000 च्या आसपास आले असून, तर जीएसटीसह किंमत ₹1,28,200 इतकी झाली आहे. मागील दिवशीच्या तुलनेत ही जवळपास ₹6000 ची घसरण आहे.
चांदीच्या दरात 7000 रुपयांची घट
चांदीच्या किमतीतही मोठा उतार पाहायला मिळाला आहे. 24 तासांच्या आत चांदीच्या दरात ₹7000 ची घसरण झाली असून, जीएसटीसह चांदीची किंमत ₹1,64,800 रुपये प्रति किलोपर्यंत आली आहे. या दरकपातीमुळे दिवाळीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काही दिवसांत बाजारात अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.
ज्वेलर्स आणि ग्राहकांचे मत
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात झालेल्या तीव्र वाढीमुळे सामान्य ग्राहकांचे बजेट बिघडले होते. मात्र, आता झालेल्या घसरणीमुळे ग्राहक पुन्हा खरेदीकडे वळत आहेत. ज्वेलर्सच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलर-रुपया विनिमय दरातील बदल आणि तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सोन्याच्या दरात चढ-उतार होत असतात.
धनत्रयोदशीला विकले गेले 125 टन सोने
इंडियन बिलियन्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांच्या माहितीनुसार, यंदा धनत्रयोदशीला देशभरात तब्बल 125 टन सोन्याची विक्री झाली. सोन्यात गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो, त्यामुळे लोक अजूनही सोनं खरेदी करण्यास उत्सुक आहेत. अनेक ग्राहक लक्झरी वस्तूंपेक्षा सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
गुरुवारी COMEX वर डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा भाव 2.26% वाढून $4157.31 प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव जवळजवळ 3% वाढून $49.03 प्रति औंस झाला. काही दिवसांपूर्वीच चांदीने $53.76 या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते.
दरकपातीमागील कारणे
विश्लेषकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या मोठ्या विक्रीनंतर व्यापाऱ्यांनी मूल्य-आधारित खरेदी सुरू केली आहे. अमेरिका-चीन व्यापारातील तणाव आणि आगामी राजकीय घडामोडींमुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या व्यवहारात चढ-उतार होत असून, सध्या भारतीय बाजारात त्याचा परिणाम दिसून येत आहे.
या दरकपातीमुळे सोने-चांदी खरेदीसाठी सणानंतरही ग्राहकांचा ओघ कायम राहण्याची शक्यता आहे.