Maharashtra Weather Alert: संपूर्ण राज्याला रविवारपर्यंत यलो अलर्ट! या जिल्ह्यात भरपूर पाऊस,

Maharashtra Weather Alert: संपूर्ण राज्याला रविवारपर्यंत यलो अलर्ट! या जिल्ह्यात भरपूर पाऊस

अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अजूनही कायम असून, त्यामुळे राज्यभर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रासाठी रविवार, दिनांक 26 ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये हा अलर्ट 27 आणि 28 ऑक्टोबरपर्यंतही कायम राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासूनच पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, पाडव्याच्या दिवशीदेखील अनेक भागांत जोरदार सरी कोसळल्या. शुक्रवारी देखील पुणे शहरासह राज्यातील अनेक भागात दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत हा कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेने सरकणार असून, त्याचा परिणाम 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यावर दिसून येणार आहे.

हवामान विभागाने 25 ते 28 ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या काळात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यलो अलर्ट अंतर्गत असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत — पालघर, ठाणे, मुंबई (25, 26), रायगड (25 ते 27), रत्नागिरी (25 ते 27), सिंधुदुर्ग (25, 26), धुळे, नंदुरबार (25, 26), जळगाव (25), नाशिक (25, 26), अहमदनगर (25 ते 27), पुणे घाटमाथा (25 ते 27), सातारा, सांगली, सोलापूर (25, 26), कोल्हापूर घाटमाथा (28), संभाजीनगर, परभणी, बीड (25 ते 27), नांदेड (26, 28), लातूर (26, 27), धाराशिव (25, 27), तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर (25 ते 27), भंडारा (25), गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ (25, 28), वर्धा आणि वाशिम (25, 26).

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या दिवाळी सणाचे वातावरण सुरू असले तरी, या अवकाळी पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करणे, तसेच नागरिकांनी प्रवास करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांमध्ये परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment