मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींपर्यंत पोहोचली आहे आणि पुढील २० वर्षांत ती १ कोटी ७५ लाख होईल असा अंदाज आहे. त्यामुळे करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा पुरवताना, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने महापालिकेवर ताण येणार आहे.
महापालिकेतून २०२४-२५ मध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार आहे. रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणीही वाढली आहे. याशिवाय, पदे भरण्यावर असलेल्या बंदीची चौकशी करावी अशी मागणीही होत आहे.
मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये ५२,२२१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील दीड कोटी नागरिकांना सेवा देण्यासाठी महापालिकेला एकूण १,४५,००० कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, सध्या केवळ १,००,००० कर्मचारी अतिरिक्त कामाचा ताण सहन करत आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांतील सव्वा कोटी लोकांना नागरी सेवा पुरवण्यासाठी महानगरपालिका अहोरात्र कार्यरत असते. यासाठी १२९ विविध विभाग कार्यरत आहेत, ज्यातील काही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडतात. नागरी सेवा पुरवण्यासाठी महापालिकेने १,४५,१११ पदे निर्माण केली होती.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरवण्यासाठी महापालिकेने विविध अतिरिक्त विभाग आणि खाती सुरू केली आहेत. मात्र, यासाठी लागणारी नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही. सेवानिवृत्ती आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेली पदेही अनेक वर्षे भरली गेली नाहीत. त्यामुळे सुमारे ५२,२२१ पदे रिक्त असल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे.