महिलांना खुशखबर : भाऊबीज निमित महिलांना ₹2000 भेट
दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना; ४० कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्ताने प्रत्येकी दोन हजार रुपयांची भेट देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटद्वारे ही माहिती दिली.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला राज्यातील लहान मुलांचे पोषण, त्यांच्या आरोग्याची काळजी तसेच गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या महिलांचे योगदान समाजासाठी अनमोल आहे. त्यांचे हे कष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळी सणानिमित्त आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीस हातभार लागेल आणि दिवाळीचा सण अधिक आनंदाने साजरा करता येईल. या योजनेसाठी शासनाकडून तब्बल ४० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांचा दिवाळी सण अधिक उत्साहात साजरा होईल, असा विश्वासही मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला.
तसेच, अंगणवाडी सेविका या समाजाची खरी ताकद आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांचा गौरव व्हावा आणि त्यांचा सण आनंदात साजरा व्हावा, यासाठीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. ही भाऊबीजेची भेट रक्कम लवकरच सेविकांच्या हाती पोहोचवली जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.