IMD Weather Update : पुन्हा मोठं संकट, अनेक राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

IMD Weather Update : पुन्हा मोठं संकट, अनेक राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

देशभरात पुन्हा एकदा हवामानातील बदलामुळे पावसाचं संकट निर्माण झालं आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये पुढील 48 तास अतिधोकादायक ठरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राबाबतही नव्या इशाऱ्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोथा चक्रीवादळाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असला तरी त्यानंतर निर्माण झालेल्या नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा वातावरण बदलू लागलं आहे. यामुळे देशातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण भारतातही आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे?

महाराष्ट्रातही पुढील एक ते दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून, या भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुन्हा पावसाचा इशारा

गेल्या काही महिन्यांत मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती पाण्याखाली गेली, पिकांचे नुकसान झाले आणि अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न कोसळले. तरीही पावसाचा सिलसिला थांबलेला नाही. हवामान विभागानं पुन्हा एकदा मराठवाड्यात पावसाचा इशारा दिला आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी इशारा

हवामान विभागानं नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडं किंवा विजेचे खांब पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनीही सध्या काढणीवर असलेल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सध्या वातावरणातील बदल आणि वारंवार येणारे चक्रीवादळांचे परिणाम लक्षात घेता, पुढील काही दिवस हवामानातील अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Leave a Comment