DA hike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी विशिष्ट टक्क्याने वाढ केली जाते, केंद्र सरकारने आताच महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता हा 55% करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने 1 जानेवारी 2025 पासून महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील सुमारे 16 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
या वाढीमुळे आता कर्मचाऱ्यांना 53 टक्क्यांऐवजी 55 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, या निर्णयाचा लाभ केवळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर सहाय्य प्राप्त शिक्षण संस्था, प्राविधिक शिक्षण संस्था, शहरी स्थानिक संस्था, नियमित आणि पूर्णवेळ कर्मचारी, कार्यप्रभारित कर्मचारी आणि यूजीसी वेतनमानातील कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.
या महागाई भत्त्याच्या वाढीमुळे राज्य सरकारवर मे महिन्यात एकूण सुमारे 300 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे, ज्यात वाढीव भत्ता आणि मागील एरियरचा समावेश आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यात सुधारणा होणार असून त्यांच्या खरेदीशक्तीमध्येही वाढ होईल. महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साह निर्माण झाला आहे.