राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा ।अवकाळी पाऊस। या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

Weather Update Today : राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून असलेला अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. २४ मेपर्यंत मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक अवकाळी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत गारपीट, तर कोकणात उकाडा आणि आर्द्रता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. तरीदेखील उकाडा आणि उष्णतेच्या झळा कायम आहेत. राज्यात शनिवारी जळगाव येथे सर्वाधिक म्हणजेच ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ईशान्य राजस्थानपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत द्रोणीय स्थिती कार्यरत आहे.

या जिल्ह्यात २४ मेपर्यंत यलो अलर्ट

नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तसेच जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत द्रोणीय स्थिती असून, त्याचा प्रभाव वाढलेला आहे. या स्थितीमुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. तसेच विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागांत पुढील तीन दिवस उष्णतेची लाट आणि आर्द्रता कायम राहणार आहे.

मध्य महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस कमी झाला आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत या भागातील काही जिल्ह्यांत गारपीट होण्याचा संभव आहे. राज्यात बहुतांश भागातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. तरीदेखील दुपारपर्यंत कडक ऊन, दुपारनंतर पावसाची हजेरी तर रात्रभर उकाडा, अशी स्थिती कायम आहे.

Leave a Comment