aadhar-Pan Link Update : 31 मे 2024 पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. जर करदात्यांनी हे केले नाही तर त्यांना दंड भरावा लागेल. या संबंधी आयकर विभागाने करदात्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे.
आयकर विभागाच्या नियमांनुसार, पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर टीडीएस दुप्पट दराने कापला जाईल. मात्र, जर 31 मे 2024 पर्यंत पॅन आणि आधार लिंक केले तर कोणतीही कारवाई होणार नाही, असे आयकर विभागाने मागील महिन्यात सांगितले होते.
दंड टाळण्यासाठी काय कराल?
आयकर विभागाने मंगळवारी ‘एक्स’ पोस्टमध्ये सांगितले आहे की, अधिक कर कापला जाणं टाळायचं असेल तर 31 मे 2024 पूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करावे लागेल. जर तुम्ही हे अगोदर केलेले नसेल, तर आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागेल.
एसएफटी रिटर्न वेळेत दाखल न केल्यास किती दंड होऊ शकतो?
परकीय चलनांचे व्यापारी, बँका, उपरजिस्ट्रार, एनबीएफसी, पोस्ट ऑफिस, बॉन्ड किंवा ऋणपत्र जारी करणारे, म्युच्युअल फंड ट्रस्टी, लाभांश देणाऱ्या किंवा शेअर पुन्हा खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी स्वतः एसएफटी रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे.
आयकर विभागाने बँका आणि परदेशी चलनाचे व्यापारी यांना 31 मे पर्यंत एसएफटी (निर्दिष्ट आर्थिक व्यवहारांचे तपशील) सादर करण्याचे सांगितले आहे. विभागाचे म्हणणे आहे की, 31 मे 2024 ही एसएफटी सादर करण्याची अंतिम तारीख आहे. वेळेत तपशील सादर केल्यास दंड टाळता येईल.
एसएफटी रिटर्न वेळेत दाखल न केल्यास दररोज 1000 रुपयांपर्यंतचा दंड लागू शकतो. एसएफटी दाखल न केल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यासही दंड भरावा लागतो. आयकर विभाग अतिरिक्त रकमेच्या देवाणघेवाणीवर एसएफटीच्या माध्यमातून लक्ष ठेवतो.