शिक्षणासाठी प्रोत्साहन! ‘लेक लाडकी’ योजनेतून आर्थिक मदत वाढली!

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याला ‘लेक लाडकी’ योजना असे म्हटले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करणे आहे. या योजनेअंतर्गत, राज्यातील गरीब कुटुंबातील 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जातील.

ही रक्कम मुलीच्या वयानुसार विविध टप्प्यांवर दिली जाईल. प्रथम मुलगी जन्माला आल्यावर तिला 5 हजार रुपये मिळतील. नंतर इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, इयत्ता सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, इयत्ता अकरावीत गेल्यावर 8 हजार रुपये आणि शेवटी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला 75 हजार रुपये मिळतील. या सर्व रकमा सरकार थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यामध्ये मुलीचा जन्मदाखला, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, मुलीचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, पोस्ट ऑफिस बचत बँक पासबुक, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचा प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविकेकडे जायला हवे. तिथे आपण वरील सर्व कागदपत्रे सादर करायची आहेत आणि अर्ज भरायचा आहे. अंगणवाडी सेविका यानंतर हा अर्ज बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे पाठवेल आणि त्यानंतर महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवला जाईल जे अंतिम मंजुरी देतील.

या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळेल. एका कुटुंबात एक किंवा दोन मुली असल्यास त्यांना लाभ मिळेल. तसेच एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीलाच लाभ मिळेल. दुसऱ्या मुलाच्या बाबतीत, पालकांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचा प्रमाणपत्र सादर करावा लागेल.

या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, त्यांच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचे कुपोषण आणि मृत्यूदर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे आहे. शिवाय, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठीही ही योजना उपयुक्त ठरेल. एकंदरीत, ही योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल

Leave a Comment