पुढील २४ तास राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषतः सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहिल्यानगर येथे देखील पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्याला उष्णतेसाठी अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत, राज्यभरात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी पडू शकतात. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड या भागांमध्ये पावसाची शक्यता अधिक असून, इतर जिल्ह्यांमध्येही पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.