Maharashtra weather : महाराष्ट्रात हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळत असून 17 आणि 18 एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाडा भागात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका आहे. यामुळे पुढचे 28 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पश्चिम हिमालय भागात सक्रिय असलेल्या पश्चिम विक्षोभामुळे हा बदल घडत असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येणार आहे.
दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवणार असून राजस्थान व गुजरातमध्ये उष्णतेचा तीव्र प्रकोप आहे. दुसऱ्या बाजूला, आसाम, मेघालय आणि बिहारमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विविध भागांमध्ये एकाच वेळी विविध हवामान स्थिती दिसून येत आहे, त्यामुळे हवामान बदलाचे चित्र अधिक तीव्र होत आहे.