Weather update : राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत वेगवेगळ्या प्रकारचे हवामान पाहायला मिळेल.
विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागात पुढील तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये मेघगर्जनेसह विजा चमकत असतील. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
धाराशिव, लातूर आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांनाही पावसाचा सामना करावा लागू शकतो. सोलापूर जिल्ह्यात सलग चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही आजपासून बुधवारपर्यंत पाऊस होणार आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची काळजी घ्यावी आणि हवामान खात्याच्या सूचनांनुसार पावसाच्या तयारीत राहावे.