लाडकी बहीण योजना : अपात्र महिलांकडून 5 हप्त्याचे एकूण 7500/- रुपये घेतले परत

लाडकी बहीण योजना: सरकारने निकष कठोर करत अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले

राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला आहे. मात्र, निवडणुकीनंतर या योजनेच्या अटी व शर्ती कठोर करण्यात आल्या असून, अर्जांची फेरतपासणी सुरू झाली आहे. यामुळे अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. धुळे जिल्ह्यातील एका महिलेच्या खात्यातून सरकारने सुमारे ७,५०० रुपये परत घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

निकष डावलून घेतलेला लाभ – कारवाईचा दणका

सरकारने योजना लागू करताना काही ठराविक निकष घालून दिले होते. मात्र, काही लाभार्थ्यांनी अटी डावलून या योजनेचा लाभ घेतला होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर संबंधित अर्जांची आणि कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेने पाच हप्त्यांचा लाभ घेतला होता. मात्र, ती सरकारी योजनांमधून लाभ घेणारी असल्याचे उघड झाल्यामुळे तिचा अर्ज रद्द करून पैसे परत घेण्यात आले.

निकषांनुसार अर्ज फेटाळले जात आहेत

राज्यात अनेक अर्ज निकषांवर खरे उतरत नाहीत. अर्ज फेटाळण्याच्या काही महत्त्वाच्या निकषांमध्ये खालील मुद्दे आहेत:

  1. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असणे.
  2. घरातील कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असणे.
  3. सरकारी नोकरीत असणे किंवा सरकारी योजनांचा लाभ घेतलेला असणे.
  4. एका योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी दुसऱ्या योजनेसाठी अर्ज केल्यास अर्ज बाद होणार.
  5. लग्नानंतर इतर राज्यात किंवा देशाबाहेर स्थायिक झालेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
  6. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारचे अर्ज भरलेल्या व्यक्तींचे अर्ज बाद केले जातील.

अर्जांची फेरतपासणी व कारवाई

पुण्यासह राज्यातील विविध भागांत अर्जांची तपासणी सुरू असून, अपात्र ठरलेल्या अर्जदारांकडून सरकारकडून मिळालेली रक्कम परत घेतली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरतपासणीसाठी निर्देश दिले आहेत. याबाबत अदिती तटकरे यांनी योजनेच्या तपशीलांवर भाष्य केले आहे.

लाडक्या बहिणीच्या नावे गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई

या योजनेच्या नावाखाली भाऊ किंवा अन्य नातेवाईकांनी रक्कम काढून घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

तक्रारींनुसार कार्यवाही

केशरी व पिवळ्या रेशनकार्डधारकांचा लाभ कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, जर या लाभार्थ्यांवरही तक्रार आली, तर त्यांची कागदपत्रे तपासून निर्णय घेतला जाईल.

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा उद्देश होता. मात्र, अपात्र अर्जदारांमुळे योजनेचा गैरवापर होत असल्याने ही कडक पावले उचलली जात आहेत.

Leave a Comment