Rain Alert Maharashtra : राज्यात या भागात पुढील ५ दिवस पावसाचा इशारा !
राज्यातील हवामानामध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या राज्यात तापमानातही मोठी वाढ झाली आहे. अकोल्यात सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, अमरावतीत ४३ अंश सेल्सिअस तापमान आहे. विदर्भातील बहुतांश भागांत तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे.
कोकणातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्ण व दमट हवामान राहणार आहे. मात्र, शुक्रवारपासून हवामान कोरडे राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आज, तर परभणी, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये उद्या व शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून रविवारी दरम्यान हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. या भागांमध्येही विजा व गडगडाटासह पाऊस पडू शकतो.